‘पृथ्वीराज, वासनिक, देवरांना लाज वाटली पाहिजे’, काँग्रेसमधला वाद पेटला

Spread the love


दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे. काँग्रेस नेते आणि महाविकासआघाडीतील मंत्री सुनिल केदार यांनी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. काँग्रेसमध्ये दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत बदल झाले पाहिजेत, अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिल्याचं समोर आलं. या २३ नेत्यांमध्ये महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्या नावाचा समावेश असल्याचं वृत्त आहे, यानंतर सुनिल केदार यांनी या तिन्ही नेत्यांवर बोचरी टीका केली आहे. 

गांधी कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित करणार्‍यांना पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागावी. माफी मागितली नाही तर हे तीन नेते राज्यात कसे फिरतात ते काँग्रेसचे कार्यकर्ते बघून घेतील. गांधी घराण्याचे नेतृत्व असेल तरच काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकतो. सोनिया गांधी यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, असं ट्विट सुनिल केदार यांनी केलं आहे. 

सुनिल केदार यांच्याआधी संजय निरुपम यांनीही अशाप्रकारे पत्र लिहिणाऱ्यांवर टीका केली होती. हे पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाची धार बोथट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. आतापर्यंत बंद खोलीत रचले जाणारे षडयंत्र या पत्रामुळे समोर आले आहे. याला केवळ एकच उत्तर आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याचा हट्ट सोडून द्यावा आणि विविध राज्यांमध्ये काँग्रेसची सुरु असलेली पडझड थांबवावी. काँग्रेसला केवळ तेच वाचवू शकतात, असे संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

काँग्रेसमधल्या नेत्यांच्या या लेटर बॉम्बनंतर सोनिया गांधी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे, या बैठकीत सोनिया राजीनामा देतील, असं सांगण्यात येत आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलं आहे. 

२३ काँग्रेस नेत्यांचा लेटर बॉम्ब, पाहा काय आहे सोनियांना लिहिलेल्या पत्रात

दुसरीकडे सोनिया गांधींनीच पक्षाचं अध्यक्ष असावं. सोनिया गांधी तयार झाल्या नाहीत, तर राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष पद स्वीकारावं, अशी मागणी करणारा ठराव महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे. तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं, अशी मागणी केली आहे. 

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *