मोदी सरकारला मोठे यश; अखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी

Spread the love


नवी दिल्ली: राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळवून देण्यात अखेर मोदी सरकारला यश आले आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी ही विधेयके सभागृहात मांडली. यानंतर अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी तिन्ही विधेयकांना कडाडून विरोध केला. या मुद्द्यावर वादळी चर्चाही झाली. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षातील खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन प्रचंड गोंधळही घातला. मात्र, सरतेशेवटी मोदी सरकारला आवाजी मतदानाद्वारे तीनपैकी दोन विधेयके मंजूर करवून घेण्यात यश आले.

शेती विधेयकं मंजूर झाल्यास सरकार शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाची हमी देणार का; शिवसेनेचा सवाल

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य, शेतकरी दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक सेवा (दुरुस्ती) ही तीनही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या विधेयकांचा निषेध कण्यासाठी भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाकडूनही विरोध करण्यात आला होता. त्यासाठी अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 

तर लोकसभेत या विधेयकांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनेही रविवारी आपली भूमिका अचानकपणे बदलली होती. शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात बैठक पार पडली होती. या भेटीत शेतकरी विधेयकांना राज्यसभेत पाठिंबा देण्याविषयी खलबते झाल्याची चर्चा होती. यानंतर आज शिवसेनेने या विधेयकांना बिनशर्त पाठिंबा देण्याची आपली भूमिका बदलल्याचे दिसून आले. 

 

त्यामुळे भाजप राज्यसभेत तोंडघशी पडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, भाजपनेही ही विधेयके मंजूर करवून घेण्यासाठी ताकद लावली होती. त्यासाठी भाजपच्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हीप बजावण्यात आला होता. याशिवाय, अण्णा द्रमुक, जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती आणि छोट्या पक्षांची मोट बांधून भाजपने दोन कृषी विधेयके मंजूर करवून घेण्यात यश मिळवले. 

Source link

Previous Article
Next Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *